अंढेरा पोस्टे हद्दीत एका दिवसात दोन वेगवेगळ्या दुःखद घटना घडल्या. एका तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत कर्जबाजारीपणाच्या विवंचनेत शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहिल्या घटनेत, अंढेरा येथील लक्ष्मण संजय पुरी (वय ३५) हा बटाईने घेतलेल्या शेताची पाहणी करण्यासाठी गेला होता. रस्त्यालगत असलेल्या पडीक विहिरीजवळून जात असताना पाय घसरल्याने तो विहिरीत कोसळला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तर दुसऱ्या घटनेत अंत्रि खेडेकर येथील प्रल्हाद संतोष माळेकर (वय ३५) या शेतकऱ्याने शेतातील सोयाबीन उत्पादन घटल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून आत्महत्या केली.